पृष्ठे

अत्तुं वाञ्छति वाहनं गणपतेराखुं क्षुधार्तः फणी
तं च क्रौञ्चपतेः शिखी च गिरिजासिंहोSपि नागाननम् |
गौरी जह्नुसुतामसूयति कलानाथं कपालोनलो
निर्विण्णः स पपौ कुटुम्बकलहाद् ईशोsपि हालाहलम् ||

- भुकेने व्याकुळ झालेल्या (शंकराच्या गळ्यातील) नागाला गणपतीचे वाहन म्हणजे उंदीर खाण्याची इच्छा आहे. तर कार्तिकेयाचे वाहन मोर त्या नागाला खाऊ इच्छितो. पार्वतीचे वाहन सिंह कार्तिकेयाच्या मोराला खाऊ इच्छितो. पार्वती शंकराच्या जटेतील गंगेचा द्वेष करते तर त्याच्या कपाळावरचा अग्नी मस्तकावरील चंद्राला पाण्यात बघतो. अशाप्रकारे घरगुती भांडणांना वैतागलेल्या शंकराने - साक्षात देवाने देखील विष प्यायले.

शंकराने हलाहल प्यायले ह्या पौराणिक कथेचा संबंध त्याच्या घरातील भांडणाशी जोडला आहे. देवांना माणसाच्या भावभावना जोडून विनोदनिर्मिती केल्याची अशी बरीच उदाहरणे संस्कृत साहित्यात सापडतात.
'कस्त्वं लोहितलोचनास्यचरणो?'  'हंसः' , 'कुतो?' 'मानसात्'
'किं तत्रास्ति ?' 'सुवर्णपङ्कजवनान्यम्भः सुधासन्निभम् |
मुक्ताशुक्तिरथास्ति रत्ननिचयः वैदूर्यरोहाः क्वचित् '
'शम्बूकाः किमु सन्ति ?' 'न' इति च बकैराकर्ण्य हीहीकृतम् ||

- हंसाला बगळे विचारतात - "तांबडे डोळे व तांबडे पाय असलेल्या पक्ष्या, तू कोण आहेस?" "हंस", "कोठून आलास?" "मानससरोवरातून" , "तिकडे काय आहे?" बगळ्यांने कुतुहलाने विचारले. "तिकडे सोन्याची कमळे असलेली वने आहेत, अमृतासारखे पाणी आहे, मोत्यांचे शिंपले आहेत, रत्नांचे खच आहेत, वैडूर्याचे कोंब देखील आहेत " . यावर ते विचारतात "तिकडे कवड्या आहेत काय" आणि हंसाने "नाही" असे उत्तर दिल्यावर सर्व बगळे खी खी करून हसत सुटले.

ह्या अन्योक्तीचा अर्थ अनेक प्रकारे लावता येईल. जसे की - प्रत्येकाची आवड आणि प्राधान्य वेगळे. किंवा आपल्याच जगात असणाऱ्यांना इतरत्र असलेल्या वैभवाची पारख नसते. तुम्हाला अजून काही सुचतोय?