पृष्ठे

स्थानभ्रष्टा न शोभन्ते दन्ताः केशा नखा नराः |
इति विज्ञाय मतिमान् स्वस्थानं न परित्यजेत् ||

- आपली जागा सोडून भलतीकडेच असलेले दात,केस ,नखे आणि माणसे कधीच शोभून दिसत नाहीत.हे जाणून शहाण्या माणसाने स्वतःचे स्थान कधीही सोडू नये.
वृक्षाग्रवासी न च पक्षिराजः
त्रिनेत्रधारी न च शूलपाणिः |
त्वग्वस्त्रधारी न च सिद्धयोगी
जलं च बिभ्रन्न घटो न मेघः ||

- झाडाच्या शेंड्यावर रहातो पण गरूड नाही, तीन डोळे आहेत पण शंकर नाही, भगवी वस्त्रे धारण केली आहेत पण साधू नाही, पाण्याने भरलेला आहे पण ढगही नाही आणि घडाही नाही. तर असा कोण? (उत्तर - नारळ )
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोSपराणि |
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही |

-ज्याप्रमाणे माणसे आपले जुने झालेले कपडे टाकून नवीन वस्त्रे धारण करतात त्याप्रमाणेच आत्मा जुने झालेले शरीर सोडून देऊन नवीन शरीर धारण करतो.
सा रम्या नगरी महान् स नृपतिः सामन्तचक्रं च तत्
पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः ।
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते वन्दिनस्ताः कथाः
सर्वं यस्य वशादगात्स्मृतिपथं कालाय तस्मै नमः ॥

- ती सुंदर नगरी, त्या नगरीचा तो महान राजा, त्याचे मांडलिक असणारया राजांचा तो समूह , त्याच्या आजुबाजूला असणारी विद्वान लोकांची सभा , चंद्राप्रमाणे सुंदर चेहेरयाच्या स्त्रिया , उदंड असा राजपुत्रांचा समूह , स्तुती गाणारे भाट आणि त्या भाटांनी गायलेल्या त्या उत्तमोत्तम स्तुती हे सर्व ज्याच्यामुळे आता केवळ आठवणींमध्ये उरले आहे अशा काळाला नमस्कार असो.
अर्थात काळाच्या ओघात काहीच शिल्लक रहात नाही.
भोजनान्ते पिबेत् तक्रं दिनान्ते च पिबेत् पयः|
निशान्ते च पिबेत् वारि वैद्यस्य किं प्रयोजनम् ||

- जेवणानंतर ताक प्यावे, दिवस संपला की दूध प्यावे आणि रात्र संपली की (सकाळी) पाणी प्यावे.असे केले तर वैद्याची काय गरज ?
क्वचित् काणो भवेत्साधुः क्वचित् गानी पतिव्रता |
विरलदन्तः क्वचिन्मूर्ख: खल्वाटो निर्धनः क्वचित् ||

- तिरळा मनुष्य क्वचितच सज्जन असतो, गाणारी बाई (कलावंतीण) क्वचितच पतिव्रता असते, विरळ दात असलेला मनुष्य क्वचितच मूर्ख असतो आणि टक्कल पडलेला माणूस क्वचितच दरिद्री असतो.